कुंभ विवाह कधी केला जातो ?
विवाह कार्यामध्ये वधू आणि वर यांच्या जन्म कुंडलीचे अध्ययन करत असताना वधूच्या जन्म कुंडली मध्ये पतीवियोग किंवा तिला वैधव्य दर्शक कुयोग आहे, असे सांगितले तर कदाचित तिचे मन विचलित होऊ शकते.ज्या व्यक्तींचा संपूर्ण ज्योतिषशास्त्रावर थोडाही विश्वास नसतो अशा लोकांच्या मनात सुद्धा शंका उत्पन्न होऊ शकते. ज्यावेळी अशा एका जातकाच्या पत्रिकेमध्ये कुयोग सांगितला जातो अथवा वैधव्य योग सांगितला जातो त्या वेळी कन्येच्या विवाहाच्या आधी कुंभ विवाह करून घेणे असे शास्त्रसंमत आहे अथवा शास्त्र सांगते. हा विधी केला जातो त्यावेळेस कुंभावरती स्थापन केलेल्या प्रत्यक्ष विष्णूशी उपवर वधूचा प्रथम विवाह केला जातो आणि त्यानंतर कालांतराने नियोजित विवाह संस्कार ज्या वराशी ठरलेला आहे त्याच्याबरोबर करण्यात येतो. आता लोकांच्या मनामध्ये असा विचार येईल की ह्या अशा विवाहा मुळे कन्येला पुनर्विवाहाचा दोष लागतो का तर शास्त्र सांगते की नाही.
कारण शास्त्रामध्ये दिलेले आहे ‘सुवर्ण, जल, पिंपळ, विष्णुरूप प्रतिमा यांच्याशी उपवर कन्येचा विवाह केला असता, त्यानंतर जो विवाह होतो तो पुनर्विवाह ठरत नाही. बऱ्याच जणांच्या मनामध्ये पुन्हा अनेक प्रश्न उद्भवू शकतात जसे की कुंभ विवाह करून असे योग टाळता येतात का? तर त्यावर शास्त्रकार असे उत्तर देतात की शास्त्रोक्त विधी केल्यामुळे विधीलिखित टळणे जरी असंभव असले तरी त्यामुळे वाटणारी भीती किंवा त्याची धास्ती टाळणे नक्कीच शक्य आहे.
बऱ्याच वेळा भीतीमुळे किंवा धास्तीमुळे मनाची बेचैनी वाढून त्या विवाह इच्छुक वधूचे मनोधैर्य खचून जाते. एकूणच हा सर्व सारासार विचार करूनच शास्त्रकारांनी वैधव्य परिहारक असा कुंभविवाहाचा विधी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे.आता आपण बरेच वेळा बघतो की जुन्याकाळी ज्योतिषी पूर्वापार चालत आलेले ज्योतिषशास्त्र अभ्यासून एखाद्याच्या पत्रिकेमध्ये असे काही दोष असतील तर त्याचे अचूक निदान करत असत किंवा हा दोष आहे हे अचूकपणे किंवा ठामपणे सांगत असत. पण सद्य: परिस्थितीनुसार जर एखाद्या ज्योतिषाने असा दोष विशेष करून कुंडली मधील मंगळ दोष असो अथवा राहू केतू इत्यादी पाप ग्रहांचा दोष कुयोग सांगितला तर दुसरे ज्योतिषी ते मत खोडून काढतात किंवा वास्तवात तसा दोष नसताना देखील आपल्या अल्प बुद्धीने त्याविषयी ग्वाही देतात. दुसरीकडे असा एखादा दोष जरी पत्रिकेमध्ये दिसून आला तरी ते तसे सांगण्याचे धाडस करत नाहीत. परिणामतः या संदर्भात कोणताच ठाम निष्कर्ष निघत नसल्यामुळे वधू पित्याच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण होते. वास्तविक पाहता असा कोणताच उपयोग नसताना देखील जर वधू चा कुंभ विवाह केला तर शास्त्राची कोणतीच हरकत नाहीये. कारण कुंभ विवाहा मध्ये आपण त्या वधूचे प्रत्यक्ष जगतपालन विष्णूशी विवाह करून देत आहोत. लौकिक विवाह संस्कार झाल्यावर शरीराचा शरीराशी संबंध येतो पण कुंभ विवाहात जिवाचा थेट परमात्माशी संबंध येतो त्यामुळे त्या वधूलाही कळून चुकते की पतीशी आपले ह्या जन्मी पुरतेच नाते असले तरी जगतपतिशी आपले नाते जन्मोजन्मीचे आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये वैधव्यकारक दोष आहे का याची शहानिशा करत राहण्यापेक्षा तिचा कुंभ विवाह करून मन निशंक करणे हेच उचित ठरेल असे शास्त्रकारांना वाटते.
जिचा विवाह ठरलेला आहे त्या वधूच्या पालकांनी आपल्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रबल आणि ताराबल यांनी युक्त असलेल्या शुभ मुहूर्तावर कन्येचा कुंभ विवाह खालील प्रमाणे करावा.
कुंभ विवाह विधी
ज्या दिवशी कुंभ विवाह करावयाचा आहे त्या दिवशी वधूच्या माता पित्यांनी सकाळी अभ्यंगस्नान करावे तसेच वधूला शास्त्रापूर्ती हळद लावून अभ्यंग स्नान करायला सांगावी. त्यानंतर कार्यारंभी प्रथम आचमन, प्राणायाम करून, देवतांचे मानपान व देशकालाचा उच्चार करून वधूपित्याने पुढील प्रमाणे कुंभ विवाहाचा संकल्प करावा.
“मम नाम्न्या: कन्य काया: नक्षत्रादि ग्रहयोगेन च विषाख्य योग जनन सूचित वैधव्य अरिष्ट परिहारार्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं कुम्भ विवाह आख्यं कर्म करिष्ये।।”तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणपति पूजनं स्वस्ति पुण्याहवाचन मातृका पूजनं नान्दी श्राद्धं आचार्य वरणं च करिष्ये। अशाप्रकारे संकल्प करून आचार्य वरण झाल्यानंतर गणपती पूजन पूर्वक पुण्याह वाचन आदि कर्म करावे. त्यानंतर अश्वत्थ युक्त विष्णूच्या सुवर्णप्रतिमेची प्राणप्रतिष्ठा पूर्वक पूजा करावी, एका पाटावर तांदुळाची पूंजी घालून त्यावर एक कलश स्थापन करावा आणि त्यावर पूर्णपात्र ठेवून त्याच्यावर विष्णूची प्रतिमा स्थापन करावी. त्यानंतर कलशाला हळद लावून षोडशोपचार पूजा करावी.”वरुणांग स्वरूपाय जीवनानां समाश्रय| पतिं जीवय कन्यायाश्चिरं पुत्र सुखं कुरु। देहि विष्णो वरं देव कन्यां पालय दुःखत:।।” अशी प्रार्थना करावी.त्यानंतर देवाला यथोचित मधुपर्क करून नवीन वस्त्र अलंकार इत्यादी अर्पण करावेत,नंतर वधूला पश्चिम मुख करून बसवावे व कन्या आणि कुंभ यांच्यामध्ये आंतरपाट धरून काही मंगलाष्टका म्हणाव्यात. त्यानंतर ॐ प्रतिष्ठा असे म्हणून अंतरपाट दूर करावा.त्यानंतर कन्येला विविध वस्त्र अलंकार देऊन गळ्यामध्ये सूत्र बांधावे.त्यानंतर कन्या व कुंभ यांना “परित्वा गिर्वणो०” या मंत्रांनी हळदीमध्ये रंगवलेल्या सूत्राने बांधावे व नंतर वधूच्या उजव्या हातावरून पित्याने पाणी सोडत अद्य शुभ तिथौ अस्याः कन्याया विशाख्य योग जनन वैधव्य दोषपनुत्तये श्री महा विष्णु रूपाय अश्वत्थ कुंभाय श्री रूपिणी मिमां कन्यां तुभ्यमहं संप्रददे।। असे म्हणून कुंभ स्वरूप साक्षात श्रीविष्णूला कन्या अर्पण करावी.नंतर बांधलेले सूत्र काढावे आणि तो कुंभ जलामध्ये विसर्जन करावा.आचार्यांनी वधूवर इंद्र ,वरूण, पवमान इत्यादी विविध मंत्रांनी अभिषेक करावा.त्यानंतर वधूला स्नान करून वस्त्रांतर करून येण्यास सांगावे व विधीमध्ये नेसलेले वस्त्र याचकास दान कराण्यास सांगावे. तसेच “यन्मया प्रांचि जनुषि०” ‘भो ब्राह्मणाः अहम् अनेन कुम्भ विवाह कर्मणा अनघास्मि?’ असे तीनदा विचारणा करावी. नंतर आचार्यांनी ‘त्वमङ्घासी एवमस्तु ‘ असे तीन वेळा प्रति वचन द्यावे.शेवटी अनेक कुंभ विवाहेन श्री महाविष्णू: प्रियताम|| असे बोलून संकल्प पूर्ती करून गणपती इत्यादी देवतांचे विसर्जन करावे. आणि आचार्य, गुरुजनांना भोजन अथवा शिधा द्यावा.
शास्त्रोक्त पद्धतीने कुंभ विवाह करण्यासाठी नमो गुरुजी यांना संपर्क करा.

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
