Home>Blog>योग व शांती>वयोवस्थाशांती

वयोवस्थाशांती

vayovastha-shanti

पूर्व सुकृतानुसार चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास झाल्यावर भारत वर्षात प्राप्त होणारा मनुष्यजन्म हे खरोखरीच पूर्व पुण्याईचे लक्षण आहे.अन्य योनींमध्ये जन्मल्यास काही थोडे लाभ असतीलही परंतु मोक्षाच्या दिशेने प्रवासाची इच्छा असलेल्यास मनुष्यजन्म होऊन तेथे स्वधर्मवर्णाश्रम व अवस्थेला अनुसरून काही धर्मकृत्ये धर्मशास्त्रानी सांगितली आहेत. यात चार भेद कोणते आहेत तर नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त होय. स्नान, संध्या, देवपूजा,वैश्वदेव इ. नित्यकर्मे; श्रावणी,पार्वणश्राद्ध, भाद्रपदातील गणेशपूजन, शारदीय नवरात्रौत्सव इ. नैमित्तिक कर्मे तसेच विशिष्ट कामनेनी होणारे गणेशयाग, नवचंडी, पर्जन्ययाग, नारायण-नागबळी इ.काम्य कर्मे व जाणतेपणी अथवा अजाणतेपणी घडलेल्या धर्मबाह्य कृत्याने उद्भविणारे पातित्य परिहाराकरिता विविध प्रायश्चित्त विधी. या सर्व प्रकारात आपला प्रतिपाद्य विषय म्हणजे वयोवस्थाशांती. ही वयाच्या ऐंशीव्या वर्षी एकंदरीत सहस्र चंद्र पाहिल्याने उद्भविणाऱ्या अरिष्ट परिहारार्थ करावयाची शांती असल्याने नैमित्तिक प्रकारात येणारी आहे.

अर्थात शब्दशः अर्थ सांगायचा झाल्यास एक सहस्र चंद्र पाहिल्यावर जो शांतीविधी करायला सांगितलेला आहे त्याला सहस्रचंद्रदर्शन शांती असे म्हणतात. आता हे सहस्र चंद्र कसे मोजायचे याबाबत सर्वांना कुतूहल असते.त्याचे गणित पुढील प्रमाणे आहे. अमावास्ये खेरीज रोज पाहिला जाणारा चंद्र मोजायचा, की ज्या दिवशी चंद्र पाहिला असेल तोच चंद्र मोजायचा ?; की पौर्णिमेचा चंद्र मोजायचा असे बरेच प्रश्न पुरोहितांना विचारले जातात .अशावेळी जुन्या धर्मशास्त्रकार यांनी लिहिलेल्या पोथी पुराणांचा आधार घेतला जातो त्यापैकीयाबाबत वेदशास्त्रसंपन्न श्री. नारायणशास्त्री जोशी – आंजर्लेकर यांचे ‘वयोवस्थाभिधशांतीसमुच्चयः’ नावाच्या निबंधातील (पुस्तकातील) संदर्भाच्या आधारे पुढील गणना सांगत आहे –

अशीतिवर्षे संप्राप्ते जनानान्मरणं ध्रुवं ।
सहस्रेन्दोर्दर्शनं च जायते वै तदा ध्रुवम् ।।

जन्मापासून ७९ वर्षें पूर्ण झाल्यावर ( ८० वर्षाच्या सुरवातीस ) एक हजार चंद्रदर्शने होतात. ते अनिष्टफल देणारे असल्यामुळे तो दोष परिहारार्थ शांती करावी. प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला सूर्याच्या बरोबर असलेल्या (लुप्त) चंद्राचे दुसऱ्या महिन्याच्या सुरवातीस म्हणजे प्रतिपदेला किंवा कदाचित द्वितीयेला चंद्रदर्शन होते. याप्रमाणे प्रतिवर्षी १२ चंद्रदर्शने होतात. ७९ वे वर्ष संपल्यावर १२ X ७९ = ९४८ चंद्रदर्शने होतात. अधिकमास साधारणपणे साडेबत्तीस महिन्यानंतर येतो, म्हणून ती साधारण २८ चंद्रदर्शने मिळविल्यास ९४८ + २८ = ९७६ संख्या मिळते. खग्रास चंद्रग्रहणातील मध्यवेळेत अमावास्येप्रमाणे चंद्राचा पूर्ण लोप होऊन पुन्हा प्रतिपदेप्रमाणेच चंद्रकोर दिसते. (चंद्राच्या पुर्णलोपानंतर असल्याने ते हि मोजावे लागते.) ७९ वर्षापर्यंत अशी खग्रास चंद्रग्रहणे २४ पेक्षा जास्तीच होतात. ती मिळविल्यास ९७६+२४= १००० चंद्रदर्शने पाहून होतात.

ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला चांगले संस्कार केले शिक्षण दिले आणि एक सुजाण नागरिक बनवले ते हि आपल्या आयुष्यातील एक वंदनीय व्यक्ती आहेत व त्यांच्या या प्रचंड व निर्लोभ कार्यांच्या ऋणातून मुक्त होणे शक्यच नाही पण फुल किंवा फुलाची पाकळी अर्पण करण्याच्या हेतूने अशा विधींचे आयोजन केले जाते. जसे जन्म देणारे आईवडील हे पूजनीय तसेच ज्ञानाच्या रूपाने दुसरा जन्म देऊन सांभाळणारे गुरुही पूजनीयच. बरेच वेळा आपण पाहतो की आपण शिक्षण झाल्यानंतर आपल्या पूजनीय गुरुजनांना विसरून जातो किंवा बरेचसे शिष्य मंडळी गुरुजींना विसरतात. तसेच काही मंडळी फार फार तर फक्त गुरुपौर्णिमेला गुरुजींची आठवण काढतात. या निमित्ताने सुचवावेसे वाटते कि नोकरी-धंदा-व्यवसाय काहीही करीत असलो तरीही आपल्या गुरुजींच्या संपर्कात राहिल्यास त्यांनाही आनंद वाटत असतो. वयाच्या ५० वर्षानंतर दर पाच पाच वर्षांनी अशा शांती करण्याचा धर्मशास्त्राचा सल्ला आहे व प्रधानदेवताभेदानुसार त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. पाचपाच वर्षांचाच टप्पा घेण्याचे कारण विचाराल तर, दर पाच वर्षांनी भोवतालच्या परिस्थितीत जाणविण्याइतपत फरक पडत असतो.

‘वेदांग ज्यौतिष’ या पुस्तकाच्या संदर्भानुसार पाचपाच वर्षांच्या कालावधीस एक युग म्हणतात, व सध्या दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुका, पंचवार्षिक योजना, पाचपाच वर्षांनी बदलणारी पिढी इ. गोष्टी पाहिल्यास पाच वर्षांचा टप्पा सांगण्यामागे खूपच योग्य विचार जाणवतो. ५० व्या वर्षी वैष्णवी, ५५ व्या वर्षी वारुणी, ६० व्या वर्षी उग्ररथ, ६५ व्या वर्षी मृत्यंजय-महारथी शांती, ७० व्या वर्षी भैमरथी, ७५ व्या वर्षी ऐन्द्री, ८० व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन शांती, ८५ व्या वर्षी रौद्री शांती, ९० व्या वर्षी कालस्वरूप सौरी शांती, ९५ व्या वर्षी त्र्यंबक महारथी शांती व १०० व्या वर्षी शताब्दी-महामृत्युंजय शांती अशी या शांतीची नावे आहेत. पण यापैकी साठीशांती , पंच्याहत्तरी व सहस्रचंद्रदर्शन शांती या विशेष प्रसिद्ध आहेत. सांप्रत या शान्तींचे स्वरूप आनंदसोहळ्यासारखे असले तरी संकल्पनेनुसार ते अरिष्ट परिहारार्थ केलेले कर्म आहे याचे भान असावे.आपण बरेच वेळा बघतो की अनेक जण आपल्या आई-वडिलांच्या किंवा घरातील नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही धार्मिक कृत्य न करता एखाद्या संस्थेला देणगी देतात. देणगी देण्याला दुमत नाहीये परंतु देणगी देऊन आयुष्यामध्ये येणाऱ्या अरिष्ठांचा परिहार होऊ शकत नाही.एरव्ही आशीर्वाद किंवा शुभेच्छा देताना ‘शतायुषी भव’, ‘जीवेम शरदः शतम्’ अशी वाक्ये आपण नेहमी म्हणतो. वेदामध्ये मानवी आयुष्य शत म्हणजे शंभर वर्षाचे मानिले आहे. तर काही ज्योतिषाचार्यांनी १०८ किंवा १२० वर्षे आयुर्मर्यादा ठरविली आहे. आपल्या पत्रिकेत अष्टोत्तरी किंवा विंशोत्तरी महादशा म्हणजे जातकाचे १०८ किंवा १२० वर्षाचे आयुर्मान गृहीत धरूनच लिहिलेली असते. थोड्याफार फरकाने हत्तीचेही वय १२० वर्षाचेच मानले आहे. सर्वात वयस्कर जिवंत कासव अडीचशे वर्षाचे असल्याची अधिकृत नोंद आहे. कृतयुगातील काही ऋषी दहा हजार वर्षे जगल्याचा उल्लेख आढळतो. वाल्मिकी रामायणात उल्लेखिलेली विश्वामित्रांची तपश्चर्यासुद्धा अशीच दीर्घ कालावधीची आहे.

आचार्य शौनक व आचार्य भट्टभास्कर यांनी तसेच अन्य आचार्यांनीही ( बृहच्छौनक , वैखानस इ. ) या वयोवस्था शांती थोड्याफार फरकाने सांगितल्या आहेत. या सर्व शान्तींचे सामान्य स्वरूप म्हणजे देहशुद्धिपूर्वक प्रधानसंकल्प, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, मुख्यदेवता स्थापना व पूजन, अग्निस्थापना, ग्रहमंडलदेवता स्थापना व पूजन, ग्रहहोम, प्रधानदेवता होम, उपदेवता-नक्षत्रदेवता होम, आयुष्याभिवृध्यर्थं सूक्तपठण, स्विष्टकृतादि होम, बलिदान, पूर्णाहुती, होमाचे उत्तरांग, स्थाप्य देवतांचे उत्तरपूजन, कलशोदकाने अभिषेक, अग्निपूजन-विभूतिधारण, दुध+गुळ+तीळ मिश्रण पिणे, काशाच्या वाटीतील पातळ तुपात स्वतःचे रूप (चेहरा) बघणे, आचार्य व अन्य गुरुजींना दक्षिणा व अन्य दानसंकल्प व ब्राह्मणसमाराधना(ब्राह्मण भोजन) करून कर्मसमाप्ती असे आहे.

या सर्व शान्तींच्या संकल्पात वर्तमान आणि भविष्य काळात उद्भवू शकणारे विविध रोग, दृष्टीमान्द्य , स्वतःची सावली नीट न दिसणे ( म्हणजे अंधत्वामुळे न दिसणे असा अर्थ नसून; मृत्यू समीप आल्याची जी लक्षणे सांगितली आहेत त्यात एक लक्षण हे सुद्धा आहे.), सहधर्मचारिणी अथवा पुत्र वियोग, आई-वडिलांच्या मुत्युचे दुःख, धन-धान्य-पशुसंपत्तीचा ऱ्हासाने सुचविलेले अरिष्ट परिहार व्हावे हा मुख्य उद्देश असतो. आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे सामान्यतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाची शारीरिक,मानसिक शक्ती कमी होऊ लागते. विविध रोग,पीडा निर्माण होऊन त्यामुळे मनस्ताप, क्लेश, त्रास, अनियंत्रित राग, मुलांकडून अपेक्षित कृत्य न घडल्याने मनस्ताप असे वेगवेगळे क्लेश सहन करावे लागत असतात. वार्धक्य हे शारीरिक व आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीसापेक्ष चांगले किंवा वाईट असते. काहींना ते नकोसे वाटते तर काहीजण एवढ्या कालावधीत न भोगलेले भोग या काळात भोगतात. निवृत्तीनंतर परदेशगमन, सामाजिकसेवा, आरोग्यसंरक्षण, आवडीच्या छंद-खेळातून आनंद मिळविणे अशा विविध मार्गातून आनंद प्राप्ती करून घेणारेहि बघायला मिळतात. व आजाराने ग्रासलेले, नोकरीतून निवृत्त झाल्या झाल्या नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पुन्हा बंधनात अडकलेले, मुलांकडून उपेक्षित, पैसा अडका असूनही दारिद्र्यात रहावे लागणारे असेही वयोवृद्ध बघायला मिळतात. याच कालखंडात शारीरिक व्याधी डोके वर काढू लागतात. मुले आपापल्या कार्यात व्यस्त होऊ लागतात. व अशा वयस्कर व्यक्तींना कित्येकदा आपण परावलम्बी असल्यासारखे वाटू लागते. त्यातून मग अबोलपणा किंवा अति बडबड, आपली जीवनतत्वे व नव्या पिढीची जीवनतत्वे यांच्यातील असमतोल असे विविध प्रश्न उद्भवतात.

एकत्र कुटुंब पद्धतीत वयस्कर मंडळीना खूपच आधार असतो. नातवंडांना देखील आजी आजोबांचा सहवास असण्याचे भाग्य असावे लागते. अशा आजी-आजोबांनी आपल्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यात जे चढ-उतार पहिले, अनुभविले आहेत त्या अनुभवाचा लाभ पुढील पिढीलाही होणे आवश्यक असते. अशा शान्तींच्या निमित्ताने या व्यक्तींना मनातले सांगण्याची संधी देता येते. सध्याच्या काळात साठीनंतर बाहेर फिरणे, प्रवास हे कठीणच झाले आहे, तेव्हा या शांतीच्या निमित्ताने कुटुंबियांचे जणु स्नेह संमेलनच होते व हा क्षण अशा व्यक्तींना खूपच आनंद देणारा असतो. तेव्हा अशा शांती म्हणजे पन्नाशी पुढील व्यक्तींकरिता उत्साह वाढविणारे जणु धार्मिक औषधच. दक्षिण भारतात पंच्याहत्तरीच्या शांतीचे वेळीस या दाम्पत्याचा विवाहसोहळा पुन्हा साजरा केला जातो. ( त्याच पत्नीशी हे महत्वाचे ) साधारणतः पंचविसाव्या वर्षी जो विवाह होतो तो मातापित्यांकडून संपन्न केला जातो, पंच्याहत्तरीला साजरा केला जाणारा असा सोहळा मात्र मुलामुलींकडून व नातवंडांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. कित्येक दाम्पत्य अशा सोहळ्यात मुलासुनांच्या व कन्याजावयाच्या तसेच नातवंडांच्या आनंदात सहभागी होतात व विवाहाच्या वेळी करू न शकलेल्या अनेक आनंददायक कृती (सगळ्याच धार्मिक असतील असे नाही ) करतात. अर्थात हे सर्वच व्यक्तींना शक्य होऊ शकेल व सर्वांना मान्य होईलच असेही नाही.
मार्कंडेय मुनींचे व सप्त चिरंजीवांचे या निमित्ताने पूजन किंवा प्रार्थना केली जाते. या सर्वांची चरित्रे अद्भुत आहेत. मार्कंडेयांच्या चिरंजीवत्वाची कथा मोठी अद्भुत आहे व ती फारशी प्रसिद्ध नसल्याने सांगतो आहे. ‘मृकण्डु’ ऋषींनी पुत्रप्राप्तीकरिता तपश्चर्या केली. तेव्हा ईश्वर प्रसन्न होऊन त्यांना वर देण्याविषयी उद्युक्त झाला. ईश्वराने, दोन प्रकारचे पुत्र माझ्यापाशी आहेत; असे त्या ऋषींना सांगितले. एक शतायु परंतु विद्याहीन; आणि दुसरा अल्पायु परंतु विद्यासंपन्न. ह्यापैकी मृकण्डु ऋषींनी विद्येकडे दृष्टी देऊन अल्पायु पुत्र पत्करिला. शिवाच्या प्रसादाने त्यांना पुढे जो पुत्र झाला तो सोळा वर्षेपर्यंत जगण्याचे ठरलेले होते. हा मुलगा, आयुष्य संपण्याचे वेळी शिवाराधन करीत बसलेला होता. तेव्हा पुर्वसंकेताप्रमाणे यमदूत त्याला नेण्याकरिता आले. परंतु, शिवाराधनात गढून गेलेल्या ह्या तेजस्वी पुरुषाचे प्राण हरण करण्यास त्यांचे धैर्य होईना. तेव्हा ते यमधर्माकडे परत गेले असता प्रत्यक्ष यमधर्माचीच स्वारी तेथे आली; आणि त्या यमधर्मांनी शिवपूजा करीत बसलेल्या मुलाला पाश टाकिला. तेव्हा पिंडींतून प्रत्यक्ष ईश्वर प्रकट झाला व शूलादि आयुधांनी त्याने यमधर्माला प्रहार केला; आणि ह्या मुलाला मी सोळा वर्षे आयुष्य दिलेले आहे म्हणजे म्हणजे माझी सोळा वर्षे दिलेले आहे. असे शंकराने यमधर्माला कळविले. ( देवांचा एक दिवस म्हणजे मानवांची हजारो वर्षे होतात म्हणूनच सोळा वर्षे म्हणजे लाखो-कोट्यावधी वर्षे होतील अशा गणिताने. ) मार्कंडेयमुनी षोडशकल्पायु झाला. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य व परशुराम असे सप्त चिरंजीव प्रसिद्ध आहेत.

अशा शांतींच्या निमित्ताने ‘तुलादान’ म्हणजे ज्या व्यक्तीची शांती असते त्यांच्या वजनाएवढ्या दान संकल्पनेत येणाऱ्या वस्तू ब्राह्मणांना तसेच दान घेण्यास अधिकारी असणाऱ्यांना दिल्यास ते महत्पुण्यकारक असते. बऱ्याचदा तांदूळ,गहू किंवा तत्सम धान्य, साखर,गूळ यांनी तुला केली जाते. काही कल्पक माणसे पुस्तकांनी किंवा वस्त्रांनी तुला करतात. (अर्थात हि पुस्तके व वस्त्रे सात्विक संकल्पनेत येणारी हवी.) सामान्य मनुष्याची प्रवृत्ती सहज दान करण्याकडे नसते ; या शांतीच्या निमित्ताने असे दान घडते व त्याचे पुण्यही प्राप्त होते. पूजा करायची असेल तर योग्य मार्गदर्शन आवश्यकच — म्हणूनच, पूजन केवळ *नमो गुरुजींच्या मार्फत शांति विधी करावा.

वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना.

चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !

मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !

चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !

मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !

जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!

त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !

{ दीर्घायुष्यासाठी सप्तचिरंजीवांची प्रार्थना }

मार्कणडेय महाभाग सप्तकल्पान्त जीवन।
आयुरारोग्यमैश्वर्यं देहि मे मुनिपुङ्गव।।१।।

द्रोणे मे त्वं महाभाग ऋद्रतेज:समुद्भव।
आयुर्बलं यशो देहि अश्वत्थामन् नमोस्तुते ।।२।।

दैत्येन्द्र कुल संभूत यज्ञ दान क्रियारत।
बले त्वाम् शरणं यामि दीर्घायुष्यं प्रयच्छमे।।३।।

वसिष्ठ कुल संभूत वेदशास्त्र विशारद।
नारायणाम् शसंभूत वेदव्यास नमोस्तुते।।४।।

अंजनि गर्भ सम्भूत कपिन्द्र शचिवोत्तम।
राम प्रिय नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष मां सदा।।५।।

बिभिषण नमस्तुभ्यं राम पादाब्ज पुजकं।
आयुरारोग्यमैश्वर्यं देहि पौलस्त्यनन्दनम्।।६।।

द्विजेंद्र भरताचार्य सर्व विद्या विशारद।
शरणं त्वां प्रपन्नोस्मि कृप मां रक्ष सर्वदा।।७।।

रेणुकेय महाभाग कार्तवीर्य कृतांतक।
आयुः प्रयच्छ मे राम जामदग्य नमोस्तुते।।८।।

८० व्या वर्षी करावयाची वयोवस्था शांती असो किंवा त्या आधीच्या वाढदिवसानिमित्त करावयाच्या इतर शांती असो. नमो गुरुजी तर्फे संपूर्ण शास्त्रोक्त विधी केले जातात. त्यासाठी पुरोहित निश्चित करण्यासाठी इथे संपर्क करा.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!