Home>Blog>कथा>मंगळागौरी व्रतकथा

मंगळागौरी व्रतकथा

mangalagauri-vratkatha

श्रीगणेशाय नमः ॥

एकदा युधिष्ठिराने प्रश्न केला की, “नंदनंदना गोविंदा! आजपर्यंत आपणाकडून मी बहुत कथा ऐकल्या. आता पुत्र व आयुष्य देणारे व्रत श्रवण करण्यासाठी माझे मन अत्यंत उत्कंठित झाले आहे.” ॥१॥

हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण सांगतात – “हे शत्रुनाशका, धर्मा! अवैधव्यकारक (सौभाग्य देणाऱ्या) व्रताची चित्तवेधक अशी फार पुरातन कथा तुला सांगतो, तू सावधान होऊन ऐक. ॥२॥

पूर्वी कुंडिन नावाचे एक नगर होते, तेथे ब्राह्मणांवर अत्यंत प्रीती करणारा धर्मपाल या नावाने प्रसिद्ध असा एक मोठा धनवान वैश्य राहत होता. ॥३॥ तो सपत्निक असून पुत्रसंतानरहित असल्यामुळे आपणास पुत्र नाही या योगाने निरंतर अंतःकरणात व्याकुल असे. त्याच्या घरी भस्म लावलेला व रुद्राक्षांच्या माळा धारण केलेला ॥४॥ असा एक जटाधारी भिक्षुक (बैरागी) नित्य येत असे. त्या बैराग्याचे दर्शन सर्वांना अत्यंत प्रिय असे. तो कधीही धर्मपालाचे अन्न स्वीकारीत नसे. ते पाहून त्याची स्त्री पतीला म्हणाली – ॥५॥

“अहो स्वामिन्! एक जटाधारी भिक्षुक नित्य आपल्या घरी येतो, परंतु आपल्या घरचे अन्न घेत नाही, त्यामुळे मला निरंतर वाईट वाटते.” तिचे म्हणणे ऐकून धर्मपाल भार्येला म्हणाला, ॥६॥ “हे प्रिये! तू एके दिवशी हातात सुवर्ण घेऊन अंगणात गुप्तरूपाने उभी राहा. आणि तो ज्या वेळी भिक्षेसाठी येतो त्यावेळी हे निष्पापे प्रिये! तू त्या बैराग्याच्या पदरात सुवर्णादी द्रव्य टाक.” ॥७॥

धर्मपालाच्या भार्येने पतीच्या आज्ञेप्रमाणे केले. त्यावेळी, त्या जटाधारी भिक्षूने तिला असा शाप दिला की, ‘तुला अपत्य होणार नाही’ ॥८॥ हे त्याचे शापयुक्त भाषण ऐकून ती अत्यंत दुःखित होत्साती त्या भिक्षूला म्हणाली, “अहो स्वामिन्! आपण मला माझ्या अपराधामुळे शाप दिला खरा, परंतु आता मला क्षमा करून त्या शापासून माझा उद्धार करावा.” ॥९॥

अशी प्रार्थना करून ती दीन भाषण करणारी धर्मपालाची भार्या त्याच्या पायांवर पडली, तेव्हा तो जटिल म्हणाला, “हे मुली! तू माझ्या आज्ञेने आपल्या पतीला सांग की, ॥१०॥ तुम्ही निळी वस्त्रे परिधान करून निळ्या घोड्यावर बसून अरण्यात जावे आणि जेथे आपला घोडा अडखळेल तेथे खणावे. ॥११॥ म्हणजे तेथे अत्यंत रमणीय, सभोवती पक्ष्यांनी युक्त, मृगसमुदायाने व वृक्षांनी व्याप्त, सुवर्णाने बांधलेले, रत्ने व माणके इत्यादीकांनी अत्यंत शोभायमान, ॥१२॥ अनेक प्रकारच्या पुष्पांनी युक्त असे देवालय दृष्टिगोचर होईल. त्या मंदिरात भक्तांवर प्रेम करणारी पूज्य जगदंबा भवानी आहे. ॥१३॥ तिचे अंतःकरणपूर्वक यथाविधी आराधन कर, ती भवानी तुला उद्धरील.” हे भिक्षूचे आशादायक भाषण ऐकून, ॥१४॥ त्याचे चरण वारंवार वंदून प्रार्थना करू लागली. पण तो जटिल तात्काळ गुप्त झाला. ॥१५॥

तेव्हा ती पतीला म्हणाली, “अहो प्राणनाथ! जरा इकडे या आणि त्या भिक्षूने केलेले भाषण आदरपूर्वक श्रवण करा.” असे म्हणताच पती जवळ आला, तेव्हा तिने त्यास तो भिक्षू जसे बोलला होता, त्याप्रमाणे सर्व सांगितले. ते ऐकून तो तिचा पती धर्मपाल ‘बरे आहे’ असे म्हणून ॥१६॥ स्वतः निळी वस्त्रे परिधान करून, निळ्या घोड्यावर बसून वनात गेला; तो जाताना मार्गात अनेक प्रकारचे वृक्ष वगैरे पाहून भयाने व्याकूळ झाला. ॥१७॥ तसेच नाना प्रकारचे हिंस्त्र पशू, सिंह व सर्प यांस मार्गात पाहून भयभीत झाला. पुढे अनेक प्रकारे शोभायमान असे सरोवर त्याने पाहिले. ॥१८॥ ते असे की, लाल व कृष्णवर्णाच्या कमलांनी व चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्यांनी शोभणारे फार रमणीय होते. त्या सरोवरात धर्मपालाने स्नान करून पितृतर्पणादी कर्मही केले. ॥१९॥

आणि पुन्हा तो अश्वावर बसून गहन अरण्यात गेला आणि ज्या ठिकाणी घोडा अडखळलेला पाहिला तेथे तो अश्वावरून खाली उतरून ॥२०॥ त्या जागी देवालय लागेतोपर्यंत भूमी खणू लागला. खणता खणता तेथे मोठे विशाल देवालय त्याने पाहिले. ॥२१॥ रत्ने, मौक्तिके व माणिके यांनी सर्वत्र मढविलेले ते देवालय पाहून व भिक्षूचे वाक्य स्मरून तो अत्यंत विस्मय पावला. ॥२२॥

नंतर भरजरी वस्त्रे, अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये, उत्तम अक्षता, चंपकादी पुष्पे, विशेषे करून धूप, दीप, ॥२३॥ तसेच अनेक उत्तम पक्वान्नांनी व षड्रसांनी संपन्न, नाना प्रकारच्या भाज्या व चटण्या, कोशिंबिरी यांनी युक्त, दूध, तूप, साखर सहित असा नैवेद्य ॥२४॥ आणि हस्तप्रक्षालनार्थ मलयाचलावर उत्पन्न झालेले चंदन, नानाप्रकारची फळे, तांबूल व दक्षिणा अशी सर्व पूजासामग्री तयार करून मनात संतोष पावला. ॥२५॥

आणि देवीच्या सगुण स्वरूपाचे ध्यान मनात आणून तो गुप्त रीतीने एका बाजूस बसून देवीमंत्राचा जप करू लागला. तोच देवी गर्भगृहातून येऊन भक्ताने मोठ्या आदराने केलेली पूजा पाहताच त्या पूजेचा स्वीकार करण्याविषयी लुब्ध झाली ॥२६॥ आणि प्रसन्न होऊन म्हणाली की, “या असल्या अगम्य स्थळी ही पूजा संपादन झाली तरी कशी? ज्याने ही पूजा सिद्ध केली असेल त्याला मी अद्भुत वर देईन.” ॥२७॥

हे भाषण ऐकताच तो धर्मपाल देवीपुढे हात जोडून उभा राहिला. त्यावेळी ती भगवती देवी म्हणाली – “हे निष्पापा धर्मपाल! तू माझी सर्वोत्कृष्ट रीतीने पूजा केलीस. ॥२८॥ हे माझ्या भक्ता! वर माग. मी तुला पुष्कळ धन देते.” धर्मपाल म्हणाला – “हे जगज्जननी! तुझ्या कृपाप्रसादाने माझ्याजवळ धनसंपत्ती खूप आहे. ॥२९॥ आता मी केवळ पितरांना तारणारे असे उत्तम अपत्य प्राप्त व्हावे असे इच्छितो. माझ्या घरी नित्य एक भिक्षुक येतो, परंतु मी पुत्ररहित असल्यामुळे तो माझे अन्न ग्रहण करीत नाही.” ॥३०॥

त्यामुळे भार्येसहवर्तमान मला निरंतर फार दुःख होते,” असे धर्मपालाचे दीन भाषण ऐकून देवी म्हणाली, ॥३१॥ “हे धर्मपाला! तुझ्या नशिबात सुखदायक अपत्य नाही. परंतु तुझे मागणे तरी काय? वैधव्य प्राप्त होणारी कन्या मागतोस? ॥३२॥ की अल्पायुषी पुत्र पाहिजे? अथवा दीर्घायु असून अंध असा पुत्र झाला तरी चालेल?” हे ऐकून धर्मपाल म्हणाला – “हे माते! अल्पायुषी पण चांगला शहाणा पुत्र दे; म्हणजे तेवढ्यानेच मला कृतकृत्यता वाटेल ॥३३॥ आणि माझे पितर घोर नरकात जात आहेत, त्यांचा उद्धार होईल.” हे त्याचे भाषण ऐकून देवी म्हणाली – “माझ्या पार्श्वभागी असणाऱ्या गणपतीच्या नाभीवर चढून ॥३४॥ त्या गणपतीच्या बाजूस आंब्याच्या वृक्षाने अद्भुत फळ घेऊन ते तू आपल्या भार्येला दे; म्हणजे त्यापासून पुत्र होईल यात संशय नाही.” ॥३५॥

असे देवीचे भाषण ऐकल्यावर तिच्या पार्श्वभागी जाऊन गणपतीच्या नाभीवर चढून देवीच्या आज्ञेप्रमाणे एक फळ घ्यावयाचे ते सोडून त्याने मोहाने खूप फळे घेतली, परंतु खाली उतरून पाहतो तो एकच फळ त्याने आपणाजवळ पाहिले. ॥३६॥ अशी पुनः पुन्हा पुष्कळ फळे घेऊन खाली आला, परंतु प्रत्येक वेळी पाहतो तो एकच फळ आपणापाशी आहे असे त्याच्या दृष्टीस पडे. नंतर वारंवार चढण्याच्या त्रासाने गणपती क्षुब्ध होऊन त्याने धर्मपालास शाप दिला की, ॥३७॥ “तुझ्या पुत्राला सोळावे वर्ष लागले की सर्पदंश करील.” हे ऐकून त्या काळी धर्मपाल ते फळ उत्तम प्रकारे वस्त्रात बांधून घरी आला. ॥३८॥
आणि ते फळ भार्येला दिले व त्या महापतिव्रतेने ते भक्षण केले. पुढे थोड्या काळात ती स्त्री पतीशी रममाण होऊन गर्भ धारण करती झाली. ॥३९॥ पुढे क्रमाक्रमाने नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने उत्तम पुत्राला जन्म दिला, त्या वेळी त्याचा पिता धर्मपाल मनात मोठा संतोष पावून त्याने त्या पुत्राचे जातकर्म केले. ॥४०॥ सहाव्या दिवशी षष्ठीपूजन केले. नंतर बारावा दिवस आला तेव्हा त्याचे ‘शिव’ असे नामकरण करून त्यास शिव या नावाने हाक मारू लागला. ॥४१॥ सहाव्या महिन्यात त्याने पुत्राला अद्भुत आश्चर्यकारक संस्कारयुक्त अन्नप्राशन करविले. तिसरे वर्षी चूडाकर्म (चौल) केले. हे धर्मा! आठव्या वर्षी मुलाचे सर्वोत्कृष्ट रीतीने उपनयन (मुंज) केले आणि तो धर्मपाल अंतःकरणात संतोष पावला. ॥४२॥

पुढे त्या मुलाला दहावे वर्ष लागले असता त्याची महापतिव्रता स्त्री पतीला म्हणाली – “हे नाथ! सुमुहूर्तावर या बालकाचा विवाहही करावा.” ॥४३॥ त्या वेळी धर्मपाल म्हणाला की, “मी पूर्वी या बालकास काशीयात्रा करून आणण्याचा संकल्प केला आहे. मुलगा ती यात्रा करून येऊ दे व नंतर त्याचा विवाह करू.” ॥४४॥ असे बोलून धर्मपालाने त्या मुलाला शालका (मेहुण्या) समागमे यात्रेला पाठविले. तेव्हा तो शालक विपुल धन घेऊन काशीयात्रेला निघाला. ॥४५॥
पुढे ते दोघे मामा-भाचे मार्गात नाना प्रकारे दान-धर्म करीत प्रतिष्ठानपुरास (पैठणास) आले. तेथे एका रमणीय स्थळी काही कन्या क्रीडा करीत आहेत असे त्यांनी पाहिले. ॥४६॥ त्या कन्यांच्या मेळाव्यात गौरवर्ण अशी सुशीला नावाची एक कन्या होती. तिच्या एका मैत्रिणीने तिच्याशी मोठे भांडण केले ॥४७॥ आणि ‘हे अभागिनी, विधवे!’ अशा शिव्या पुन्हा पुन्हा सुशीलेला दिल्या; मग सुशीला म्हणाली – “हे शुभमुखी सखी! तू मला व्यर्थ अभद्र शिव्या दिल्यास. ॥४८॥ कारण माझ्या मानवती नावाच्या मातुश्रीला शुभकारक मंगळागौरीचे व्रत आहे. त्या व्रताच्या प्रभावाने आमच्या आप्तसंबंधी सर्व स्त्रिया प्रिय आहेत. ॥४९॥ आजन्मपर्यंत सौभाग्यवतीच राहिल्या तेव्हा त्या मानवतीची मी प्रत्यक्ष कन्या असल्यामुळे आजन्म सौभाग्यवतीच राहीन, याबद्दल संशय नाही. हे सुंदरी! त्या श्रेष्ठ मंगलागौरी व्रताचा किंचित् प्रताप सांगते.” ॥५०॥

तो असा की, “जेथे मंगलागौरीच्या पूजनांतही धूपदीप लावले जातात, त्या स्थळी तेवढ्यानेच सर्वत्र सुख लाभते,” असे त्या कन्येचे भाषण ऐकून (मामा) विस्मयाने प्रफुल्लित नेत्र झालेला ॥५१॥ त्या बालकाचा मामा त्या भाच्याचे कल्याण होण्याविषयी चिंतन करू लागला. तो विचार करू लागला की, या मुलीच्या हातच्या अक्षता जर या बालकाच्या मस्तकावर पडतील, तर हा मुलगा खरोखर शंभर वर्षे जगेल. असे वारंवार मनात आणून ॥५२॥ तो मातुल विस्मयाने प्रफुल्लित नयन होऊन त्या सुशीला नामक कन्येकडेच पाहू लागला आणि सुशीला स्वगृही जाण्यासाठी निघाली तो तिच्या मागे ते मामा-भाचे निघाले. ॥५३॥
नंतर ती गौरांगी सुशीला आपल्या घरी गेली, आणि मामा-भाचे तिच्या घराजवळ उत्तम तळयावरील रमणीय प्रदेशात चांगला आश्रम पाहून राहिले. ॥५४॥ पुढे सुशीलेचा विवाहकाल करू लागला आणि जवळच राहणारा हर नावाचा एक वर त्याने पाहिला. ॥५५॥ त्यावेळी हर लग्न करण्याला अशक्त आहे असे पाहून त्याचे माता-पिता उभयता मोठ्या नम्रतेने हात जोडून त्या यात्रेकरिता आलेल्या मामाजवळ येऊन ‘हा तुमचा शिव नावाचा भाचा आम्हाला द्या,’ अशी याचना करू लागले. ॥५६॥

ती अशी की, येथे हरीच्या सुशीला नामक मुलीशी आमच्या मुलाचा विवाह करण्याचे ठरविले आहे, परंतु आमचा मुलगा तर यावेळी लग्नाला अयोग्य दिसतो; ॥५७॥ याकरिता हे उदार मामा! तुम्ही आपला शरीरसंपत्तिमान् शिव नावाचा भाचा लग्नसमयी जरासा आम्हाला द्या. लग्नोत्साह उरकल्यावर आम्ही तुमचा शिव तुम्हाला देऊ. ॥५८॥ हे ऐकून मातुल म्हणतो – “महाराज! हा मधुर भाषण करणारा शिव तुम्ही लग्नकाली अवश्य घ्यावा.” असा करार झाल्यावर पुढे विवाहमुहूर्त प्राप्त झाला असता सुमुहूर्ती त्या सुशीलेचे पाणिग्रहण शिवाने केले. ॥५९॥
आणि त्या विवाहाच्या दिवशी रात्री सुशीलेसह मधुरभाषी अशा शिवाने तेथेच निद्रा केली. त्या रात्री ती साध्वी तेजःपुंज मंगलागौरी देवी सुशीलेच्या मातुश्रीच्या रूपाने येऊन सुशीलेला हितकारक वचन बोलली. ॥६०॥ ते असे की, गौरी म्हणते, “हे गौरांगी सुशीले! तुझ्या पतीला दंश करण्यासाठी मोठा भयंकर भुजंग आला आहे, याकरिता लवकर ऊठ, आणि त्या सर्पापुढे दूध ठेव. ॥६१॥ आणि त्या दुधाजवळ लागलीच एक कलश ठेव म्हणजे तो भुजंग दूध प्राशन करून त्या कलशात जाईल, नंतर तू आपल्या अंगातील चोळी काढून त्या चोळीने त्या कलशाच्या तोंडाला बांध. ॥६२॥ आणि प्रातःकाळी उठून तू तो तोंड बांधलेला उत्तम कलश आपल्या आईला वायन दे.” गौरीचे हे भाषण ऐकून सुशीला तत्क्षणी उठली. ॥६३॥

तो पुढे फुत्कार टाकीत आहे, असा महाभयंकर भला मोठा कृष्णसर्प सुशीलेने पाहिला. तेव्हा गौरीच्या आज्ञेप्रमाणे सर्व तिने केले व ती पुन्हा निजली. ॥६४॥ तिचा पती शिव जवळच झोपलेला होता तो जागा होऊन म्हणाला की, “मला फार भूक लागली आहे तरी मला खाण्यासाठी लाडू वगैरे काही उत्तम पदार्थ दे.” ॥६५॥ असे पतीचे भाषण ऐकून सुशीलेने उत्तम लाडू सुवर्णपात्रात घालून दिला. तो खाऊन सुवर्णपात्रात त्याने आपली अंगठी घालून सुशीलेला दिली. ॥६६॥ आणि सुशीलेने दिलेले ते सुवर्णपात्र शिवाने खुणेसाठी म्हणून आपल्यापाशी गुप्तस्थानी ठेविले. आणि तो सर्व कर्मांत चतुर शिव त्या स्थळीच सुखाने निजला. ॥६७॥

पुढे प्रातःकाल होताच शिव आपले बिर्‍हाडी आला. इकडे सुशीलेने देवीच्या आज्ञेप्रमाणे स्नान करून शुचिर्भूत होऊन आपल्या मातेला रात्री तोंड बांधलेला व आत सर्प असलेला, अशा कलशाचे वायन दिले. ॥६८॥ तो त्या कलशात सर्पाऐवजी सर्वोत्कृष्ट मोत्यांचा हार त्या मातेच्या दृष्टीस पडला. तत्काल ती मनात अत्यंत संतुष्ट झाली व तिने तो हार आपल्या आवडत्या सुशीलेला दिला. ॥६९॥

नंतर दुसऱ्या दिवशी विवाह कौतुकाने वधुवरे खेळविण्याची वेळ येताच पूर्वी ज्या मुलास ती सुशीला देण्याचा संकेत केला होता व नकळत त्याच्याऐवजी शिवाशी लग्न लावले, तो हर नावाचा मुलगा सुशीलेच्या मंडपात आला. तो येताच माता त्या सुशीलेला क्रीडार्थ बोलावू लागली. सुशीलेने पाहिले तो हा आपला पाणिग्रहणकर्ता वर नव्हे. तेव्हा ती आपल्या मातेला म्हणाली, ॥७०॥ “हे जननी! ज्याने माझे पाणिग्रहण केले तो वर हा नसल्यामुळे हा माझा पती नव्हे. यास्तव याच्यासहवर्तमान क्रीडा करण्याविषयी माझ्या मनाची इच्छा होत नाही.” ॥७१॥

असे कन्येचे भाषण ऐकून तिचे मातापिता अत्यंत चिंताक्रांत झाले आणि त्यांनी आपल्या जावयाचा शोध लावण्यासाठी ब्राह्मणसंतर्पणनिमित्ताने अतिथिअभ्यागताला अन्नदान करणे हाच बेत योजला. ॥७२॥ आणि त्या दिवसापासून सुशीलेचे मातापिता पुराणोक्त विधीने नित्य अन्नदान करू लागले. त्या सत्रात अशी व्यवस्था केली होती की, ती सुशीला आपल्या हातात ती मुद्रिका घालून अतिथीचे पादप्रक्षालन करीत असे. ॥७३॥ आणि तिची माता वरून उदक घालीत असे. हरीचा पुत्र गंध देत असे व हरी स्वतः तांबूल देत असे. अशी सुरेख व्यवस्था पाहून तेथे पुष्कळ अतिथी येऊन भोजन करून जाऊ लागले. ॥७४॥

याप्रमाणे अतिथीला सौख्य देणारे अन्नदान सतत चालूच राहिले. इकडे काशीयात्रेस निघालेले ते दोघे मामा-भाचे सुखरूपपणे काशीत येऊन पोहोचले. ॥७५॥ तेथे त्यांनी भागीरथीच्या निर्मल उदकात भक्तिपूर्वक स्नान केले आणि नंतर ते दोघे तेथून स्वर्गद्वाराच्या यात्रेला जाताना वाटेत उत्तम दानधर्म करीत चालले. ॥७६॥ ते असे की, घरोघरी भिक्षुकांना पीतांबर व वस्त्रे देत चालले. तेव्हा ते भिक्षुक ब्राह्मण शिवाला आशीर्वाद देऊ लागले की, हा मुलगा चिरंजीव होईल. ॥७७॥

पुढे ती यात्रा करून पुन्हा काशीत येऊन पुन्हा-पुन्हा विश्वेश्वराला नमस्कार करून त्यांनी त्याची स्तुती केली. याप्रमाणे यात्रा उरकून ते उभयता आपल्या घरी जाण्यासाठी निघाले; तो मार्गात शिव एकाएकी म्हणाला – ॥७८॥ “मामा! आज मला बेचैन वाटते.” असे म्हणताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले व तेथे यमदूतही हजर झाले. ॥७९॥ त्या वेळी मंगलागौरी त्याच्या संरक्षणार्थ तेथे आली, तेव्हा तिचे व यमदूतांचे मोठे भयंकर युद्ध झाले. त्या युद्धात मंगलागौरीने यमदूतांना जिंकून त्या शिवाला प्राणदान दिले. ॥८०॥

नंतर शिव पडलेला होता तो एकाएकी उठला व मामाला म्हणाला की, “मी आज स्वप्नात मंगलागौरी व यमदूत यांचे भयंकर युद्ध पाहिले. ॥८१॥ त्यात मंगलागौरीने यमदूतांना जिंकले असे पाहून मी जागा झालो.” हे शिवाचे बोलणे ऐकून मामा म्हणाला – “हे शिवा! जे झाले ते झाले. त्याची आठवण तू पुन्हा करू नको. ॥८२॥ आता आपण तुझ्या मातापितरांचे दर्शन करण्याविषयी उत्कंठित आहोत, म्हणून आपल्या नगरात जाऊ.” असे बोलून ते तेथून निघाले व पैठणला पुन्हा आले. ॥८३॥

आणि तेथे पूर्वीच्या रमणीय सरोवरात ते दोघे राहून स्वयंपाकास आरंभ करू लागले. त्यावेळी हरीच्या दासींनी ह्या दोघांना श्रेष्ठ धैर्य व औदार्य यांनी संपन्न असे पाहिले. ॥८४॥ तेव्हा त्यांना हरीच्या दासी म्हणतात की, “अहो पांथ हो! येथून समीपच हरीच्या घरी अन्नसत्र चालले आहे, तेथे आपण चलावे.” ते ऐकून ते दोघे म्हणाले की, “दासी हो! आम्ही वाटसरू आहोत. याकरिता आम्ही कोठेही कोणाच्या घरी जात नाही.” ॥८५॥
असे त्यांचे भाषण ऐकून दासी आपल्या घरी गेल्या आणि आपल्या धन्याजवळ मोठ्या आदराने ते वर्तमान सांगू लागल्या. ॥८६॥ त्यावेळी सर्व दासींचे ते भाषण ऐकून मोठ्या सत्काराने त्यास आणण्यासाठी त्या यजमानाने खूप हत्ती, अश्व इत्यादी वाहने आणि रत्ने, वस्त्रेही पाठविली. ॥८७॥ तेव्हा ते बहुत सन्मानाने आलेले बोलावणे पाहून ते प्रवासी आश्चर्यचकित होऊन तत्काल हरीच्या घरी आले. त्यावेळी हरी हा त्या उभयता प्रवाशांपैकी मातुलाची पूजा करून त्याच्या शिव नामक भाच्याची पूजा करण्यासाठी आला. ॥८८॥

तेव्हा ती सत्रव्यवस्थापक हरीची कन्या त्या शिवाचे आपल्या हाताने पादप्रक्षालन करू लागली. त्यावेळी त्याला पाहताच ती लज्जित होऊन मातेला म्हणाली की, “आई! हाच मी वरलेला पती आहे.” ॥८९॥ तेव्हा हरी आश्चर्याने त्या मंगलकारक दर्शनस्वरूप शिवाला विचारते की, “हे शिवा! तू आमच्या मुलीचा पती असशील असे अनुमान वाटते; पण अशाबद्दल तुझ्यापाशी काही खूण आहे काय? असेल तर सांग.” ॥९०॥
तेव्हा शिव म्हणाला की, “अल्पस्वल्प काही खूण आहे.” असे बोलून तो आपल्या राहात्या घरी आला आणि तेथे ठेवलेले सुवर्ण पात्र आणून मोठ्या आदराने दाखविले. ॥९१॥ त्या वेळी ते पात्र पाहून हरीने ती सुशीला कन्या त्याच्या स्वाधीन केली आणि बहुत रत्ने, वस्त्रे, सुवर्ण त्या जावयाला दिले. ॥९२॥

तेव्हा त्या कन्येला घेऊन ते दोघेही तेथून निघाले व निघताना ब्राह्मणांना खूप द्रव्य वाटले. नंतर मार्गात श्रावणमास प्राप्त झाला असता त्या सुशीलेने मंगळवारी मंगलागौरीचे व्रत केले. ॥९३॥ आणि उत्तम भोजन करून ते सर्व तेथून निघून चार कोसपर्यंत पुढे गेले. तेव्हा सुशीला म्हणाली की, “मंगलागौरीला आरती करून तिचे विसर्जन करीन ॥९४॥ आणि नंतर आपण मातापितरांस आदरपूर्वक भेटण्यासाठी जाऊ.” असे तिने बोलताच जेथे गौरीचे आवाहन केले होते, त्या जागी ते आले. ॥९५॥

तो त्यांनी गौरीपूजनस्थळी सुवर्णाचे उत्तम देवालय पाहिले. नंतर त्या सुशीलेने देवीला आरती करून तिचे विसर्जन केले. ॥९६॥ नंतर ते सर्व मातापितरांस भेटण्यासाठी मोठ्या उत्कंठेने तेथून निघाले. ते कुंडिन नगराजवळ येताच त्यांना पाहून तेथील तेथील लोक विस्मित होऊन ॥९७॥ प्रियदर्शनाच्या योगाने उत्सुक झालेले धर्मपालाजवळ बोलू लागले की, “हे धर्मपाल! तुझा पुत्र भार्येसह आणि मेहुणा हे तिघेही आज ॥९८॥ नगरासमीप आले. कशावरून म्हणशील तर आम्ही त्यांस आताच पाहून आलो.” असे लोक जो बोलत आहेत एवढ्यात, तेही तेथे आले. ॥९९॥ आणि त्या पितृभक्त पुत्राने मातापितरांस अनेक नमस्कार केले. तसाच त्याच्या मातुलानेही भगिनी व धर्मपाल यांस नमस्कार केला. ॥१००॥

तशीच सुशीलाही सासूसासऱ्यांस नमस्कार करून जवळ उभी राहिली. तेव्हा सासू म्हणाली – “हे कमलनयने सुशीले! ज्या व्रताच्या प्रतापाने माझ्या पुत्राची आयुष्यवृद्धी झाली, ते व्रत मला सांग.” ॥१०१॥ सुशीला म्हणाली – “अहो सासूबाई! मी व्रत जाणत नाही, तर केवळ मानवती व हरी या मातापितरांना जाणते. श्वशुर धर्मपाल व आपण सासूबाई ॥१०२॥ तशीच मंगलागौरी आणि तुमचा पुत्र व माझा पती यांना मात्र मी जाणते. याहून दुसरे काहीच जाणत नाही.” असे बोलून ती सुशीला अंतःकरणात हर्षयुक्त होऊन भोजन करिती झाली. ॥१०३॥

श्रीकृष्ण म्हणतात – “हे धर्मा! हे असे मंगलागौरीचे व्रत अवैधव्यकारक आहे म्हणून स्त्रियांनी सर्वदा करावे.” युधिष्ठिर विचारतो – “हे कृष्णा! या व्रताचे फल श्रवण केले. हे केशवा! आता याचे विधान सांगा.” ॥१०४॥ तेव्हा कृष्ण सांगतात – “श्रावणमासी चारही मंगळवारी हे व्रत करावे. ते असे की, स्त्रियांनी प्रातःकाळी उठून मंगलस्नानपूर्वक या उत्तम व्रताचा संकल्प करावा ॥१०५॥ व षोडशोपचारांनी मंगलागौरीचे पूजन करावे. तसेच सोळा दीपांनी निरांजन (आरती) करावी. ॥१०६॥ नंतर माता व इतर सुवासिनी यांस उत्तम वायन द्या, आणि निरांजनाकरिता केलेले पिठाचे दीप व अळणी अन्न वगैरे भक्षण करावे. ॥१०७॥ नंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी मंगलागौरीला आरती करून तिचे विसर्जन करावे. अशा क्रमाने व्रत करावे. असे हे व्रत आपल्या पतीला पूर्ण आयुष्य प्राप्त होण्याची इच्छा करणाऱ्या स्त्रियांनी लग्नापासून पाच वर्षे करावे.” ॥१०८॥

॥ इति श्रीभविष्योत्तरपुराणे मंगलागौरीव्रतसार्थकथा समाप्तः ॥

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    आणखी वाचा
    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!