श्रीयंत्र: समृद्धी, चैतन्य आणि साक्षात श्रीमहालक्ष्मीचे निवासस्थान
श्री यंत्र पूजनाचे महत्त्व आणि फलप्राप्ती
आपणा सर्वांना माहिती आहेच की श्रीयंत्र म्हणजेच साक्षात महालक्ष्मी स्वरूप होय, अशी आपली श्रद्धा आहे. शास्त्रानुसार ज्या वास्तूमध्ये महालक्ष्मी स्वरूप श्री यंत्राची विधीवत पूजा स्थापना केली जाते त्या ठिकाणी श्री अष्टलक्ष्मींचा वास असतो आणि तिथे सुख-समृद्धी नांदते, असे मानले जाते. हे श्री यंत्र म्हणजे ईश्वरी शक्तीचा आविष्कार तसेच संपूर्ण कृपादृष्टी मिळावी यासाठी प्रभावी असे माध्यम आहे. श्रीयंत्र हे त्यापैकीच एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ फलदायी यंत्र मानले जाते.
यंत्र म्हणजे काय?
यंत्र म्हणजे विशिष्ट भौमितिक आकृत्या,पुष्पदले, रेषा, वर्तुळे,त्रिकोण, बीजाक्षरे आणि बीजमंत्रांच्या माध्यमातून ईश्वरी शक्तीला आवाहन करण्याचे आणि तिची कृपा प्राप्त करण्याचे एक साधन होय. धनसंपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी श्रीयंत्र,, लक्ष्मीगणेश यंत्र, महालक्ष्मी यंत्र ,श्रीसुक्त यंत्र यांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे काही नकारात्मक शक्तींपासून आणि संपूर्ण जीवनकालात येणाऱ्या संकटांपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र, दत्तात्रेय यंत्र अशा स्वरूपातल्या यंत्रांची विधिवत पूजा केल्यास निश्चितच फलप्राप्ती होते.
श्रीयंत्राची स्थापना आणि पावित्र्य
ह्या श्री यंत्राची निर्मिती ही अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे. हे श्रीयंत्र पूजेसाठी ठेवण्याअगोदर विशिष्ट अशा मुहूर्ता वरती प्राणप्रतिष्ठा सिद्धीकरण शुद्धीकरण आणि विधिवत पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे, बाजारातून किंवा तीर्थक्षेत्रातून यंत्र आणून देवघरात ठेवण्यापूर्वी, ते जाणकार व्यक्तीकडून सिद्ध केलेले आहे का, आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे का, हे तपासून घेणे व तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यंत्राची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्याच्यातील दैवी शक्तीचा पूर्ण अनुभव प्राप्त होऊ शकत नाही.
नित्य उपासना आणि पूजन आराधना:
आपल्या देवघरामध्ये श्री यंत्राची स्थापना केल्यानंतर दररोज पूजा करणे आवश्यक आहे किंवा कमीत कमी दिवा उदबत्ती ओवाळून मनोभावे नमन करणे गरजेचे आहे. आपल्या वेळेची उपलब्ध उपलब्धता तसेच यंत्राविषयी श्रद्धेनुसार रोज सोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा अभिषेक जप बीज मंत्र उपासना किंवा होम हवन आधी विविध प्रकारे आराधना करता येते. ज्या प्रकारे आराधना केली जाते, त्या प्रमाणात फलप्राप्ती होते.
श्रीयंत्र: त्रिपुराशक्तीचे प्रतीक
शास्त्रकारांच्या मते श्रीयंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक ही मानले जाते श्री ललिता देवीच्या साधने मध्ये हे यंत्र अत्यंत प्रभावी तसेच उपयोगी माध्यम आहे. श्रीयंत्राशिवाय श्री ललिता महात्रिपुरासुंदरी देवीच्या साधनेचे परिपूर्ण फळ मिळू शकत नाही.
ब्रह्माण्ड पुराणातील उल्लेखाप्रमाणे, ज्या देवीच्या गर्भामध्ये ३३ कोटी देव-देवतांचा वास आहे, अशा श्रीललिता त्रिपुरासुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. त्या निवासस्थानामध्ये देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तसेच ब्रम्हा विष्णू आणि महेश वास करतात, म्हणूनच, श्रीयंत्राची पूजा करणाऱ्या भक्तास विश्वातील समस्त देव-देवतांची पूजा केल्याचे पुण्य तात्काळ मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते
श्रीयंत्राची अद्भुत संरचना
श्रीयंत्रामध्ये अत्यंत अद्भुत पद्धतीने संपूर्ण ब्रह्मांडाची संरचना सामावलेली आहे. यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भौमितिक रचना एकमेकांत गुंफलेल्या असतात.ते कसे हे आपण आता जाणून घेऊया. या यंत्रातील ९ चक्रे ही मनुष्य देहातील ९ आध्यात्मिक चक्रांसमान आहेत. श्रीयंत्राच्या केंद्रस्थानी एक बिंदू असतो आणि सर्वात बाहेरच्या बाजूला भूपूर असते. भूपुराला चारही बाजूंनी चार द्वारे असतात.
बिंदूपासून भूपुरापर्यंत एकूण दहा विभाग असतात, ते खालीलप्रमाणे आहेत.
- केंद्रबिंदू (सर्वानंदमय चक्र)
- त्रिकोण (सर्वसिद्धिप्रद चक्र)
- आठ त्रिकोण (सर्वरक्षाकर चक्र)
- दहा त्रिकोण (सर्वरोगहर चक्र – अन्तर्दशार)
- पुन्हा दहा त्रिकोण (सर्वार्थसाधक चक्र – बहिर्दशार)
- चौदा त्रिकोण (सर्वसौभाग्यदायक चक्र – चतुर्दशार)
- आठ पाकळ्यांचे कमळ (सर्वसंक्षोभण चक्र – अष्टदल)
- सोळा पाकळ्यांचे कमळ (सर्वाशापरिपूरक चक्र – षोडशदल)
- तीन वृत्ते (त्रैलोक्यमोहन चक्र)
- तीन भूपूर (भूपूरचक्र / शिवात्मक चक्र)
अशा स्वरूपामध्ये श्रीयंत्र पहावयास मिळते आणि ते पूजेमध्ये ठेवल्याने फलप्राप्ती होते.
श्रीयंत्र प्रतिमेची पौराणिक कथा अशी सांगितली जाते
एकदा श्री लक्ष्मी अप्रसन्न होऊन वैकुंठाला निघून गेल्या अशा त्यांच्या निघून जाण्याने पृथ्वीवरती अनेक समस्या निर्माण झाल्या त्यावेळी श्री महर्षी वशिष्ठ ऋषींनी लक्ष्मी मातेला पृथ्वीवरती परत आणण्याचा निश्चय केला. त्यांचे वैकुंठातील प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्यांनी कठोर तपश्चर्येला प्रारंभ करून श्रीमहाविष्णूंना आवाहन केले. श्रीविष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वसिष्ठऋषींसोबत महालक्ष्मीकडे जाऊन प्रार्थना केली, परंतु देवीने पृथ्वीवर परत न जाण्याचा आपला आग्रह कायम ठेवला.
तेव्हा खिन्न मनाने परतलेल्या वसिष्ठमुनींनी सर्वांना सांगितले की, आता श्रीयंत्राची निर्मिती करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.त्यावेळी देव गुरु बृहस्पती यांनी वसिष्ठ ऋषींना श्रीयंत्र निर्मिती कशी करावी याचे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे, वसिष्ठ ऋषींनी आपल्या आश्रमामध्ये दीपावलीतील धनत्रयोदशीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावरती विधिपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली. प्रतिमेचे षोडशोपचारे पूजन होताच, श्रीमहालक्ष्मी आपल्या सर्व सिद्धींसह त्या श्रीयंत्र सिंहासनावर प्रकट झाली. देवीने सर्वांना आशीर्वाद दिला आणि म्हणाली की, “तुम्ही जो श्रीयंत्र प्रयोग केला, त्याने मी प्रभावित आणि प्रसन्न झाले आहे, त्यामुळे श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन.”
श्रीयंत्राचे अद्भुत लाभा विषयी जाणून घेऊया:
श्री यंत्राची शास्त्रोक्त आणि विधिवत पूजा केल्याने खालील प्रमाणे लाभ होऊ शकतात.
- व्यापारवृद्धी
- ऋणमुक्ती
- संतानप्राप्ती
- दारिद्र नाश होऊन अखंड सुख संपत्तीची प्राप्ती
- भौतिक सुख-समृद्धी
- अद्भुत ऐश्वर्यसिद्धी
- कुटुंबावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या शारीरिक आर्थिक आणि मानसिक प्रकारचे भय नाहीसे होते.
- विद्या, शक्ती, यश, मानसन्मान आणि सकल समृद्धी प्राप्त होते.
श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे आणि प्रगतीकडे जाण्याचा राजमार्गच आहे. हे यंत्र प्रामुख्याने अखंड पंचधातूंमध्ये विविध वजनांमध्ये उपलब्ध असते.
महत्त्वाची सूचना: श्री यंत्राची प्रातः सायंकालीन शास्त्रोक्त पद्धतीने पूजा तसेच देवीच्या विविध सहस्रनामाने कुंकूमार्चन करणे हेच श्रेष्ठ मानले गेले आहे.
श्रीयंत्राची नित्य पूजाविधी आणि फायदे:
- ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना होते, त्या घरातील सर्वांनी श्रीयंत्राची समाराधना प्रेम आणि भक्तियुक्त अंतःकरणाने करावी.
- प्रातःकाळी स्नानादी कर्मे आटोपून, शुचिर्भूत होऊन श्रीयंत्र समोर नंदादीप लावून आसनावर बसावे.
- न्यास, संकल्प, ध्यानाचे श्लोक म्हणून श्रीयंत्राची विधिवत षोडशोपचारे,पंचोपचारे पूजा करावी.
- पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीललितासहस्रनाम स्तोत्र पठण करत श्रीयंत्र प्रतिमेवर कुंकुमार्चन करावे.
- त्यानंतर बीजमंत्राचा यथाशक्ती जप करावा आणि कापूर आरती करून श्री महालक्ष्मीची सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
- सायंकाळीसुद्धा धूप-दीप प्रज्वलित करून सकाळच्या पूजेप्रमाणेच सर्वकाही करावे.
- श्रीयंत्र प्रतिमेला रोज स्नान किंवा अभिषेक करण्याची आवश्यकता नाही. फक्त पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध जलाने, शुचिर्भूत होऊन ललितासहस्रनाम स्तोत्र पठण करत अभिषेक करावा. त्यानंतर पंचोपचारे पूजा करून ललितासहस्रनाम स्तोत्र पठणाने कुंकुमार्चन करावे.
- ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र स्थापना तसेच श्रीललितासहस्रनाम स्तोत्राचा पाठ आणि कुंकुमार्चन होते, त्या वास्तूमध्ये श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवीचा नित्य वास असतो, हे लक्षात ठेवावे.
निष्कर्ष
श्रीयंत्र हे केवळ एक धातूची आकृती नसून, ते देवी भगवतीच्या चैतन्याचे आणि कृपाप्रसादाचे मूर्तिमंत स्वरूप आहे. श्रद्धा, भक्ती आणि योग्य विधीने केलेली श्रीयंत्राची उपासना निश्चितच आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि शांती घेऊन येते.शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यासाठी आणि श्री यंत्राची विधी व स्थापना करण्यासाठी तसेच त्याविषयी मार्गदर्शनासाठी नमो गुरुजी यांना अवश्य संपर्क करा.
|| श्री जगदंब उदयोस्तु! उदयोस्तु !!उदयोस्तु !!! ||

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
