चैत्र गौरी पूजा माहिती
|| सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके | शरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोsस्तुते ||
चैत्र महिना म्हणजे वसंताच्या आगमनाची चाहूल आणि त्याचबरोबर येते ती म्हणजे चैत्र गौरी. हिंदू संस्कृतीमध्ये या गौरीला देवी पार्वती असेही म्हणतात. हीच पार्वती ह्या चैत्र महिन्यात आपल्या माहेरी येते अशी जुनी समजूत आहे. भारतातील विविध भागांमध्ये या चैत्र महिन्यातील गौरीला वेगवेगळी नावे दिलेली आहेत. राजस्थानात गणगौर तर कर्नाटकात तडीगे गौरी किंवा उज्जले गौरी आणि महाराष्ट्रात तर ती चैत्रगौर म्हणून ओळखली जाते.विवाहित स्त्रियांसाठी हा महिना म्हणजे जणू काही व्रत पर्वणीच असते.चैत्र शुद्ध तृतीये पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात गौरीचा दोलोत्सव चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख महिन्यातील अक्षय तृतीयेपर्यंत साजरा करतात. हे व्रत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साजरे होत असते. त्यामुळे ते मानवी जीवनाशी आणि ऋतूचक्राशी निगडित असेच आहे. गौरीचे पूजन गुजरातमध्ये चैत्र महिन्यात संध्याकाळच्या वेळेला केले जाते.उत्तर कर्नाटकात चैत्रदा गौरीच्या व्रतामध्ये माठात पाणी भरून त्याची पूजा केली जाते. तो माठ घराबाहेर पाणपोयीसारखा ठेवला जातो. कलशासमोर गुळाच्या ढेपेवर विड्याच्या पानावर हळद पसरून ठेवली जाते. तिला हरिद्रा गौरी असे म्हणतात. ह्या व्रत कालावधीमध्ये महाराष्ट्रात सर्वसामान्यपणे देवघरातील अन्नपूर्णेची विशेष पूजा महिनाभर केली जाते. देवीला सुगंधी उटणे, सुवासिक फुले अर्पण करण्याची पद्धत रूढ आहे. त्याचबरोबर देवीला नैवेद्य म्हणून कैरीचे पन्हे, आंबे डाळ, ओले हरभरे अर्पण केले जाते. तसेच आंबा कलिंगड टरबूज अशी गोड रसाळ फळे या ऋतूत विशेषतः उपलब्ध होतात म्हणून ती ही अर्पण केली जातात. याच कालावधीमध्ये महिला हळदी कुंकू समारंभ साजरे करतात. सुवासिनी आणि कुमारिका यांना बोलावून त्यांना आंबेडाळ, कैरीचे पन्हे दिले जाते आणि त्यांची ओल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जाते. त्याचप्रमाणे घरातील किंवा कुटुंबातील ज्या माहेरवाशीण आहेत त्यांना घरी जेवावयास बोलावले जाते.
चैत्रांगण नावाची रांगोळी महाराष्ट्रात चैत्र महिन्यात काढली जाते. घराच्या अंगणात सारवण करून त्यावर ही रांगोळी रेखण्याची पद्धत आहे. झोपाळ्यात बसलेली गौरी चैत्रांगणाच्या मध्यभागी काढली जाते. तिच्या भोवती चंद्र, सूर्य, राधाकृष्ण, गोपद्मांचा गणेश, स्वस्तिक, तुळशी वृंदावन, शंख , चक्र, गदा, कमळ , डमरू, कामधेनू, धनुष्यबाण अशी भारतीय संस्कृतीशी संबंधित विविध मंगलचिन्हे रेखाटली जातात. ती रांगोळी अंगणात केवळ चैत्र महिन्यात काढण्याची पद्धत असल्याने तिला ‘चैत्रांगण’ म्हटले जात असावे.
त्या जोडीला मूग, मटकी, ज्वारी असे धान्य एका कलशात पसरून तो कलशही देवीच्या बाजूला ठेवला जातो. वेगवेगळ्या प्रकारांच्या कोशिंबिरी, ताक, लिंबाचा रस, कैरीचे पेय यांचा नैवेद्य दाखवत देवीची चंदन, फुले, हार, हळद, कुंकू , उदबत्ती, निरांजन, आरती हे उपचार करून पूजा केली जाते.राजस्थानातील गणगौर हे व्रत होळीच्या दुसर्या दिवशी सुरू होते. ते एकूण अठरा दिवस करायचे असते. शिवपत्नी पार्वती दुर्गेच्या रूपात पूजली जाते. पार्वती आणि शंकर यांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते. कुमारिका त्यांना चांगला पती मिळावा म्हणून आणि विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबसौख्यासाठी हे व्रत करतात.
अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं,नाती जपावीत, घराला घरपण द्याव. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते?” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.
गुजरात या प्रांतांतही ते व्रत करतात. काही भागांत चैत्र प्रतिपदेला गणगौर व्रताची सुरुवात होते. त्यानिमित्ताने जत्रा, मेळे यांचे सामूहिक आयोजन केले जाते. त्या व्रताला गोस्वामी तुलसीदास रचित ‘रामचरित मानस’ ग्रंथातील कथा जोडलेली आहे. सीतेने तिच्या मैत्रीणींसह मंदिरात जाऊन गौरीची पूजा केली आणि योग्य पती मिळावा अशी प्रार्थना केली. गौरीने संतुष्ट होऊन तिला श्रीरामांसारखा पती दिला म्हणून त्या व्रताचे महत्त्व विशेष आहे.
चैत्रगौरीचे व्रत, विविध पूजा तसेच धार्मिक विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी नमो गुरुजीला संपर्क साधावा.

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
