दृष्ट लागणे - काय, का आणि कसे ओळखावे?
तुमचं बाळ हसतं-खेळतं असतं आणि अचानक रडायला लागतं, चिडचिड करतं. जेवत नाही, रात्री शांत झोपत नाही. तुम्ही डॉक्टरकडे जाता, पण तपासण्यांमध्ये काहीच निष्पन्न होत नाही. अशा वेळी घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या तोंडून एक शब्द हमखास ऐकायला मिळतो – “बाळाला दृष्ट लागलीये!”
नवीन पिढीतील माता-पित्यांना हा प्रकार म्हणजे केवळ अंधश्रद्धा वाटू शकतो. पण दृष्ट लागण्यामागे आपल्या पूर्वजांनी एक सखोल निरीक्षण आणि अनुभव मांडला आहे. चला, ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊया.
आजीबाईचा बटवा आणि हरवलेली परंपरा:
पूर्वी प्रत्येक घरात एक ‘आजी’ असायची. तिचं अस्तित्व म्हणजे घरासाठी एक आधारवड होता. तिच्या बटव्यात ज्येष्ठमध, वेखंड, सुंठीपासून ते प्रत्येक लहानसहान आजारावर प्राथमिक उपचार करण्यासाठी काही ना काही असे. नातवंडांची दृष्ट कशी काढावी, हे तीच आपल्या मुली-सुनांना शिकवायची. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे आजी-नातवंडांपेक्षा टीव्ही सिरियल अधिक जवळची झाली आहे, तिथे हे पारंपरिक ज्ञान मागे पडत चालले आहे.
‘दृष्ट लागणे’ म्हणजे नक्की काय?
लहान मुले अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि लोकांच्या ऊर्जेचा पटकन परिणाम होतो.
नकारात्मक ऊर्जा: जेव्हा एखादी व्यक्ती असूया, द्वेष किंवा वाईट भावनेने मुलाकडे पाहते, तेव्हा त्या व्यक्तीच्या नजरेतून निघणारी नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) मुलाच्या सकारात्मक ऊर्जा-क्षेत्रावर (Aura) आघात करते. यालाच सोप्या भाषेत ‘दृष्ट लागणे’ म्हणतात. ही असूया मुलाच्या सुंदरतेमुळे, कौतुकामुळे किंवा त्याच्या आई-वडिलांबद्दलच्या द्वेषामुळे असू शकते.
वास्तुदोष किंवा अज्ञात शक्ती: काहीवेळा घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव लहान मुलांवर अधिक होतो. यामुळेही मुले कारण नसताना रात्री रडतात, घाबरतात. विशेषतः शनिवार, अमावास्या, अष्टमी या दिवशी हा त्रास वाढलेला दिसतो.
ग्रहदशेचा प्रभाव: ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या मुलांच्या पत्रिकेत जन्मतः राहू, शनी किंवा केतूची महादशा किंवा साडेसाती सुरू असते, ती मुले अशा नकारात्मक ऊर्जेला लवकर बळी पडतात.
दृष्ट लागल्याची लक्षणे कशी ओळखावी?
बाळ अचानक दूध पिणे किंवा जेवणे बंद करते.
दिवसभर छान खेळणारे मूल संध्याकाळी (दिवेलागणीच्या वेळी) रडायला लागते.
रात्री झोपेतून दचकून उठते आणि खूप वेळ रडत राहते.
अनोळखी किंवा काही विशिष्ट व्यक्तींना पाहून घाबरते किंवा रडायला लागते.
सतत चिडचिड करते आणि आजारी असल्यासारखे वागते.
विज्ञान आणि श्रद्धा यांचा समतोल
लक्षात ठेवा, वरील लक्षणे दिसल्यास सर्वप्रथम मुलाला बालरोगतज्ञांकडे (Pediatrician) घेऊन जा. अनेकदा जंत होणे, पोट दुखणे, कानात दुखणे किंवा बद्धकोष्ठता (Constipation) यांसारख्या शारीरिक कारणांमुळेही मुले रडतात. डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
जेव्हा डॉक्टर सांगतात की बाळ शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आहे आणि सर्व वैद्यकीय चाचण्या (Reports) नॉर्मल येतात, तरीही बाळाचा त्रास कमी होत नाही, तेव्हा आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या सोप्या उपायांचा वापर करून पाहायला हरकत नाही.
पुढील लेखात आपण दृष्ट कशी काढावी, याच्या सोप्या आणि पारंपरिक पद्धती जाणून घेऊ.
बाळाची दृष्ट कशी काढावी? (सोपी आणि पारंपरिक पद्धत)
मागील लेखात आपण ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती, हे जाणून घेतले. आता आपण घरीच्या घरी बाळाची दृष्ट काढण्याच्या सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहूया.
महत्त्वाची सूचना: दृष्ट काढणे हा श्रद्धेचा भाग आहे. ही प्रक्रिया शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने करावी.
पद्धत १: ६ महिन्यांपर्यंतच्या बाळासाठी (फूल आणि पाण्याची पद्धत)
लहान बाळांची त्वचा आणि ऊर्जा नाजूक असते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही सौम्य पद्धत वापरावी.
कधी करावी: रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी.
साहित्य: एक ताजे फूल (कोणतेही चालेल), एका लहान भांड्यात (उदा. पळी, वाटी) थोडे पाणी.
कृती:
आपल्या उजव्या हातात फूल आणि डाव्या हातात पाण्याचे भांडे घ्या.बाळासमोर उभे राहून, फूल आणि पाणी बाळाच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या उलट दिशेने (उजवीकडून डावीकडे) ७ वेळा ओवाळा.ओवाळताना खालील मंत्र मनातल्या मनात किंवा हळू आवाजात म्हणा:
“दृष्ट मिष्ट, आल्यागेल्याची, नात्या-गोत्याची, भूता-खेताची, पापी चांडाळाची, वेताळ-काताळाची, काळ्या-गोऱ्या माणसाची, स्त्री-पुरुषाची, घरातल्याची-दारातल्याची, पारोशा केराची… दृष्ट दूर होवो!” नंतर ते फूल आणि पाणी घराबाहेर फेकून द्यावे. परत घरात येताना मागे वळून पाहू नये.त्यानंतर बाळाला मांडीवर घेऊन खालील मंत्र म्हणावा, यामुळे बाळाला संरक्षण मिळते.
” वासुदेवो जगन्नाथ पूतना तर्जनो हरि:। रक्षतु त्वरितोबालं मुंच मुंच कुमारकम्॥”
पद्धत २: ६ महिन्यांवरील मुलांसाठी (मीठ-मोहरीची पद्धत)
ही पद्धत तीव्र दृष्ट लागली असता किंवा नियमितपणे संरक्षणासाठी वापरली जाते.
कधी करावी: दर शनिवारी, तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमीच्या दिवशी. गरज वाटल्यास इतर दिवशीही करू शकता.
साहित्य: जाडे मीठ, मोहरी आणि फोडणीसाठी वापरली जाणारी लोखंडी डाव (पळी).
कृती:
दृष्ट काढण्यापूर्वी ५ मिनिटे लोखंडी डाव गॅसवर मंद आचेवर तापत ठेवा.आपल्या दोन्ही हातांच्या मुठीत थोडे मीठ आणि मोहरी घ्या.बाळावरून ७ वेळा (वरीलप्रमाणे) ओवाळा आणि तोच “दृष्ट मिष्ट…” मंत्र म्हणा.ओवाळून झाल्यावर जमिनीवर बोटे मोडा.आता हातातील मीठ-मोहरी त्या तापलेल्या डावेवर टाका.
सर्वात महत्त्वाची सूचना: मीठ-मोहरी डावेवर टाकल्यावर लगेच बाजूला व्हा. मोहरी तडतडून डोळ्यात उडू शकते.जेव्हा मीठ-मोहरीचा तडतडण्याचा आवाज पूर्ण बंद होईल आणि ती जळून जाईल, तेव्हा गॅस बंद करा.डाव थंड झाल्यावर त्यातील काळ्या राखेचा (अंगारा) एक लहानसा टिळा बाळाच्या कपाळाला लावावा.
हे सोपे उपाय आपल्या बाळाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवून त्याला शांत आणि आनंदी ठेवण्यास नक्कीच मदत करतील. ही केवळ अंधश्रद्धा नसून, आपल्या मुलासाठी एक सकारात्मक आणि संरक्षणात्मक ऊर्जा कवच (Protective Shield) निर्माण करण्याची एक पारंपरिक पद्धत आहे.
दृष्ट काढण्याच्या पारंपरिक उपायांसोबतच, एक अत्यंत प्रभावी आणि सात्विक आध्यात्मिक उपाय देखील आहे, जो बाळासाठी एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करतो. रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या पवित्र वेळी, घरातील मोठ्या व्यक्तीने किंवा आई-वडिलांनी श्रीरामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्राचे (भीमरूपी महारुद्रा…) श्रद्धेने पठण करावे. हे पठण करत असताना, देवासमोर ठेवलेली विभूती (भस्म) आपल्या हातात घ्यावी.
स्तोत्र पठणाने ही विभूती मंत्रशक्तीने भारित होते. पठण पूर्ण झाल्यावर, ही अभिमंत्रित विभूती बाळाच्या कपाळाला, गळ्याला आणि छातीवर लावावी.
असे मानले जाते की, या दैवी मंत्रांनी सिद्ध झालेली विभूती बाळाभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करते. यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेचा बाळाला त्रास होत नाही आणि बाळ शांत व निरोगी राहते. हा केवळ एक उपाय नसून, बाळाला ईश्वरी संरक्षणात ठेवण्याचा एक सहजसोपा मार्ग आहे.
|| नमो गुरुजी ||

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
