Home>Blog>सण व उत्सव>गार्‍हाणे – श्रद्धा आणि ईश्वराशी असलेले नाते व्यक्त करण्याचे माध्यम

गार्‍हाणे - श्रद्धा आणि ईश्वराशी असलेले नाते व्यक्त करण्याचे माध्यम

garhane1

आपल्या हिंदू धर्मात भारतीय संस्कृतीत सर्व प्रकारचे पूजापाठ,व्रतवैकल्ये, यज्ञ, होमहवन हे केवळ धार्मिक विधी नसून, ते आपल्या मनाची शुद्धता, श्रद्धा आणि ईश्वराशी असलेले नाते व्यक्त करण्याचे माध्यम आहे. प्रत्येक पूजेच्या शेवटी एक अत्यंत भावनिक आणि पवित्र घटक असतो – आणि तो म्हणजे “गार्‍हाणे”.

विशेषतः कोकण प्रांतामध्ये “गार्‍हाणे” ही पद्धत प्रचलित आहे.कोणत्याही धार्मिक विधीची सांगता हि नेहमी गाऱ्हाण्यानेच होते. प्रतिमेसमोर श्रीफळ, पानाचा विडा (नागवेलीच्या पानावर सुट्टा रुपया अन् त्यावर सुपारी) ठेवला जातो. घरातील सर्व मंडळींना हातात अक्षता ( तांदूळ) दिले जातात.आलेल्या गुरुजींमार्फत गाऱ्हाणे घातले जाते.गुरुजींच्या वाक्या नंतर इतर आलेल्या सर्व भक्तमंडळींकडून ‘होय महाराजा” असे म्हणून ह्या सगळ्यासाठी आमची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते.कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी गाऱ्हाण घालण्याची पद्धत वेगवेगळी दिसून येते. मग ते गणपती साठी असो किंवा शिमग्यासाठी असो.

मानकरी- कोकणातील ब्राम्हणांनंतर [गुरुजीं नंतर] मानाचं स्थान असणारी दुसरी व्यक्ती म्हणजे मंदिरातील गावकरी मंडळी.. त्यांना मानकरी असं संबोधलं जातं. प्रामुख्याने गुरव आणि घाडी समाजातील व्यव्क्तींना मंदिरात मान असतो. ते जत्रा तसेच इतर प्रसंगी दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या वतीने गाऱ्हाणे घालतात. नवस फेडून घेताना यांना विशेष महत्व असते. एखादी व्यक्ती आजारातून ठीक झाली, मुले पास झाली, कोणाचं लग्न ठरले अश्या वेळी बोलल्या नवसाची परतफेड केली जाते. त्यावेळी गाऱ्हाणे घातले जाते.
अर्थातच मनोभावे आपण जी पूजा केलेली आहे त्या पूजेनंतर देवासमोर मन मोकळे करून केलेली एक नम्र प्रार्थना.यामध्ये विशेषतः देवाकडे पूजेची स्वीकृती मागितली जाते, काही चूक झाल्यास क्षमा मागितली जाते, आणि आपल्या इच्छा ,आकांक्षा, सदिच्छा देवाच्या चरणी अर्पण केल्या जातात. ही परंपरा श्रद्धा, समर्पण आणि नम्रता यांचे प्रतीक आहे.

गाऱ्हाणे किंवा देवाला प्रार्थना करणे त्यामागील धार्मिक हेतू, महत्व काय आहे आणि त्यातून कुटुंबावरती कृपा आशीर्वादाचा वर्षाव कसा होईल हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. या पवित्र प्रथेचे शास्त्रशुद्ध महत्त्व समजून घेतल्यास आपला प्रत्येक पूजाविधी अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण होईल.

|| गार्‍हाणेचे शास्त्र आणि महत्त्व ||

भारतीय धर्मशास्त्रात पूजेनंतर केलेले गार्‍हाणे ही ईश्वराशी केलेली एक अंतःकरणपूर्वक संवाद प्रक्रिया मानली जाते.शास्त्रानुसार, पूजेची पूर्तता ही केवळ विधी पार पाडण्यात नसते, तर शेवटी परमेश्वराशी संवाद साधण्यात असते. गार्‍हाणे हे त्या संवादाचे माध्यम आहे. यामुळे पूजेचा उद्देश पूर्ण होतो, आणि ईश्वराशी नाते अधिक दृढ होते.

|| गार्‍हाणे – नमुना एक ||

“लक्ष्मीसहित श्रीसत्यनारायणा, कृपादृष्टी करा. हे ……………. (यजमानाचे नाव) तुमच्या चरणी प्रार्थना करत आहेत. तुमच्या प्रीत्यर्थ आज त्यांनी ही पूजेची सेवा केलेली आहे, ती तुम्ही मान्य करून घ्या. या सेवेमध्ये ज्ञानतः अज्ञानतः काही अन्याय, अपराध घडले असतील, तर त्या सर्व अपराधांची क्षमा करा.

केलेल्या सेवेने तुम्ही सुप्रसन्न होऊन या कुटुंबावर तुमची अखंड कृपादृष्टी ठेवा. कुटुंबातील सर्वांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त करून द्या. संपूर्ण कुटुंबाला सुख, समाधान, शांती, संतती आणि संपत्तीची प्राप्ती करून द्या.

प्रचलित कामाच्या ठिकाणी उत्तरोत्तर उत्कर्ष करून, त्यात त्यांना स्थिरलक्ष्मी आणि कीर्तिलाभ प्राप्त करून द्या. कुटुंबातील मुलांना सद्बुद्धी, सद्विद्या, सद्वासना, सत्प्रेरणा प्राप्त करून देऊन त्यांच्या विद्याभ्यासात उत्तम सुयश मिळू द्या.

यांच्या मनातील सर्व सदिच्छा तुमच्या कृपेने पूर्ण करा आणि या कुटुंबावर अखंड कृपादृष्टी ठेवून त्यांचा उत्तरोत्तर उत्कर्ष करा. केलेल्या प्रत्येक कर्मात त्यांना उत्तम यश प्राप्त करून द्या.कुटुंबावर तुमचे कृपा आशीर्वाद सदैव राहू द्या अशीच त्यांच्याकडून अखंड सेवा करून घेऊन सुखरूप पणे राख महाराजा.”

गार्‍हाणे:-

हे श्रीगणेशा, हे गणराया, हे शंकर-पार्वतीपुत्रा, हे कार्तिकेयाच्या भावा, हे वक्रतुंडा, हे बाप्पा मोरया, आम्ही आज तुझ्या जन्मदिवशी (किंवा जयंतीनिमित्त) हे गार्‍हाणे घालत आहोत, ते ऐकून घे महाराजा.
“होय महाराजा!”

हे देवा, तू आमच्या ह्या सगळ्या गोतावळ्याला सुखी ठेव. त्यांची सर्वांची प्रकृती चांगली ठेव. त्यांची सदैव भरभराट होऊ दे, असं आमचं तुला हात जोडून सांगणं (किंवा मागणं) आहे.

“होय महाराजा!”

हे देवा, आज आमच्या जावईबापूंचा वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य दे.

“होय महाराजा!”

हे गणनायका, लवकरच आमची दोन नातवंडं आम्हाला सोडून बाहेरगावी पुढचं शिक्षण घ्यायला जात आहेत. त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी (किंवा ‘चांगली नजर’) असू दे. त्यांचं अभ्यासात नीट लक्ष लागू दे. त्यांची दिवसेंदिवस प्रगती होऊ दे.

“होय महाराजा!”

हे गौरीपती, पुढची सगळी चार वर्षं त्या दोघांना सुखाची जाऊ देत, असं तुला आमचं सांगणं आहे.

“होय महाराजा!”

शेवटी देवा, आमच्याकडून काही चूक झाली असल्यास, किंवा तुझा काही उपमर्द झाला असल्यास, किंवा तुझा आम्हाला विसर पडला असल्यास, किंवा वडिलधाऱ्यांचा, पूर्वजांचा, वा लहानमोठ्यांचा आमच्यापैकी कोणाकडून अपमान झाला असल्यास, काही चूक झाली असल्यास, आम्हा सगळ्यांना क्षमा कर.

“होय महाराजा!”

पुढल्या वर्षीसुद्धा तुझ्या पायाशी यायला अशीच ताकद आणि बुद्धी दे, हे पार्वतीपुत्रा, तुला हे आमचं अखेरचं सांगणं आहे.

“होय महाराजा!”

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

दुसरे गार्‍हाणे (मालवणी भाषेत शिमग्याचे गार्‍हाणे):

हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा….होय महाराजा….

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा….होय महाराजा….

कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा….होय महाराजा….

कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा….होय महाराजा….

हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा….होय महाराजा….

हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नाय नाट कर रे महाराजा….होय महाराजा….

ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय.

|| निष्कर्ष ||

गार्‍हाणेही केवळ परंपरा नसून अंतर्मनाच्या सहाय्याने देवाला घातलेली एक साद च आहे. पूजेनंतर देवाशी केलेला हा संवाद आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समाधान निर्माण करतो. आपण जरी काही चुकलो असलो तरी, देव आपल्याला क्षमा करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपली दिशा स्पष्ट करतो. म्हणूनच प्रत्येक पूजेच्या शेवटी गार्‍हाणे ही प्रथा जपावी, समजून करावी आणि भावपूर्वक अनुभवावी.

पूजाविधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घेण्यासाठी संपर्क करा.

नमो गुरुजी – आपले आध्यात्मिक मार्गदर्शक.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!