शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) - संपूर्ण माहिती, व्रत आणि कहाणी
लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवामुष्टी वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा.
ही मूठ वाहताना खालील मंत्र म्हणावा:
‘नमः शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’
पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.
आपल्याकडे जे असेल तेच भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे! त्यात पुन्हा पार्वतीमातेचे पतिराज, शिव-पार्वती ह्यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा अतिमनोरम असा आदर्श म्हणून बघतो. विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहाण्यापूर्वी ‘गौरीहर’ पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर सतत यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे ह्यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजिली गेली.
सोमवार व्रत पद्धत १:
श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे. बहुतेक करून निरोगी मंडळीही श्रावणातील सोमवारचा उपवास संध्याकाळी किंवा रात्रीच भोजन करून सोडतात. आजच्या धकाधकीच्या काळात ते योग्यही आहे. दुपारी फलाहार आणि रात्रौ सात्त्विक भोजन हा शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने उचित नियम ठरावा.
सोमवार व्रत पद्धत २:
आणखी एका वेगळ्या प्रकारे सोमवार व्रत केले जाते. हे व्रत श्रावणाप्रमाणेच चैत्र, वैशाख, कार्तिक आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यांमध्येही केले जाते. मात्र श्रावणातील सोमवारी केल्यास ते विशेष मानले जाते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. तत्पश्चात ‘ओम नमः शिवाय’ ह्या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ‘ओम नमः शिवायः’ या मंत्रोच्चारासह पार्वतीमातेची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. ह्या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा-तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे.
सोमवारची [शिवामुठीची] कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?”
“महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.”
“यानं काय होतं?”
“भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.”
मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?”
“मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.” त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?”
“आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.”
“त्या वशाला काय करावं?”
“मूठ चिमुट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावी. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं ‘शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.’ असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्यास तीळ, तिसर्यास मूग, चवथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं आणि दुस-या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सास-यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे?” नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”
पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणू लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांही वाटलं नाहीं. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं.
नावडती पूजा करूं लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली.
पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं म्हणून देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, “हे असं कसं झालं?”
“माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं.”
सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
सोमवारची [फसकीची] कहाणी
ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यांत एक गरीब सवाष्ण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी, एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळीं जाऊन मनोभावें पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळीं, ‘जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकीं तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं चारी सोमवारीं तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळीं तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ति केली. शंकरांनीं तिला निरोप पाठविला. “अजून तुला, नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाहीं, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे.” पुढं शंकरांनीं तिला अपार देणं दिलं.
तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
